॥ शुभगुण निधि श्रीराघवेंद्र यति ॥

आज भक्तजनाग्रणी प्रह्लादावतारी श्री राघवेंद्र स्वामींचा वर्धंति उत्सव म्हणजेच जन्मदिवस. फाल्गुन शु. सप्तमी शके १५१७ इसवी सन १५९५ साली राघवेंद्र स्वामींचा तमिळनाडूमधील भुवनगिरी येथे जन्म झाला. भगवंताच्या अवतारास कारण झालेले प्रह्लाद भगवंताकडे सकल जनांचे कल्याण होवो एवढेच मागणे मागतात आणि जणू काही भगवंत प्रह्लादाकडूनच ते कार्य आजही करवून घेतो आहे.

काही लोक एखाद्या सत्पुरूषाविषयी ऐकून, त्यांचे चरित्र वाचून अथवा आलेल्या, ऐकलेल्या चमत्कारिक अनुभवांवरून त्या सत्पुरूषांविषयी मतं बनवतात व त्यातून त्यांची त्या सत्पुरूषाविषयी श्रद्धा उत्पन्न होते अथवा होत नाही! पण सत्पुरूषाला वरील कोणत्याही आधारे पूर्णपणे जाणता येत नाही.  एखाद्या सत्पुरूषाची परिक्षा करणारे आपण कोण असतो? पण प्रत्येकाच्या मानसिक संकल्पनांनुसार अमुक एखादा सत्पुरूष पडताळून बघण्याची काही जणांना सवय असते. पण सत्पुरूष कळतो तो त्याच्या शिकवणीमधून, त्याच्या वचनांमधून आणि नेमके त्याकडेच बऱ्याचदा आपले दुर्लक्ष होते.

स्वामींवरील एक श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे.

पुज्याय राघवेंद्राय सत्यधर्म रतायच । भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे ॥

स्वामींना कल्पवृक्ष, कामधेनु अशा संबोधनांनी आळवलं जातं! कारण त्यात आपली कुठलीतरी फलापेक्षा असते! पण ज्यांनी त्यांचं संपूर्ण अवतारकार्य नेमकं जे त्यागायला सांगितलं त्याचाच ध्यास अपाल्याला लागून राहिलेला असतो. त्यामुळे मग सत्यधर्म रतायच या चरणाकडे दुर्लक्ष होतं!

हा सत्यधर्म स्वामींनी जगून दाखवला. संन्यास घेण्याआधी पूर्वाश्रमी वेंकटनाथ असताना अठरा विश्व दारिद्र्य अनुभवलं होतं! दिवसेंदिवस केवळ उपवास घडत असे. कुंभकोणम येथील मध्वाचार्यांपासून चालत आलेल्या एका संन्यासी शिष्यपरंपरेचा मठ उभारला गेला होता. मुळची विद्वता असल्यामुळे वेंकटनाथाचे त्या मठात अध्यापन आणि अध्ययन दोन्ही चालू होते. पण त्या मठात कधीही त्यांनी भोजन घेतले नाही. तीर्थ घेऊन पुन्हा घरी यावे कारण घरच्यांना जिथे खायला काही नाही तिथे मी काही खाणार नाही. मठात सांगितले तर घरच्यांना सहज खायला मिळेल पण तसे करणे उचित नाही. भगवंत हाच दात असताना कोणासमोर का हात पसरायचे? पुन्हा मला मठात येऊ देणे हाच त्यांच्या मोठेपणा असताना मी त्यांच्यावर माझ्या घरच्यांची जबाबदारी लादणे मनाला पटत नाही! हा स्वामींचा सत्यधर्म आहे. ही शास्त्रावरील निष्ठा आहे. शास्त्र माहित असले तरी त्याचा फायदा स्वामींनी स्वतःसाठी कधी केला नाही. पूर्वाश्रमी स्वतःचे मूल रडत असताना त्याला खायला देण्यासाठी घरात काही नाही म्हणून केवळ भगवंताचे तीर्थ दिल्यावर ते शांतपणे झोपी जात असे. अशाप्रकारे प्रत्येक कर्म करताना कोणतीही फलापेक्षा स्वामींनी कधी ठेवली नाही. म्हणूनच ते आज रंजल्या-गांजल्यांसाठी कल्पवृक्ष-कामधेनु आहेत.

स्वामींनी रचलेल्या अनेक कृतींपैकी दोन महत्त्वाच्या कृती म्हणजे प्रातःसंकल्पगद्य आणि सर्वसमर्पणगद्य! प्रातःसंकल्प गद्यात स्वामींनी प्राणतत्त्वाचा महिमा सांगितला आहे. प्राण तत्त्व आहे म्हणून आपण आहोत ह्या जाणीवेनेच दिवसाची सुरूवात करावी आणि झोपताना जीव हा कर्ता नसून भगवंत हाच कर्ता आहे व तो जीवाकडून कशाप्रकारे कार्य करवून घेतो याचे विस्ताराने वर्णन करत आज दिवसभरात त्याने विविध रूपांनी विविध प्रकारे आपल्याकडून करवून घेतलेले कार्य त्याला अर्पण करत दिवसाची सांगता करावी ही शिकवण स्वामींनी त्यांच्या या दोन कृतींमधून दिली आहे.

स्वामींकडे लौकिकातील मागणारे खूप आहेत.  पण स्वामींनी ज्यासाठी अवतार घेतला ते भगवंताच्या भक्तीचे बीज आपल्या अंतरंगात पेरले गेले आहे का हे आपण पाहिले पाहिजे. आणि तेच मागणे स्वामींकडे मागितले पाहिजे. स्वामी ते आपल्याला निश्चितच देतील. सर्वांचा उद्धार व्हावा हे मागणं ज्यांनी प्रह्लादावतारात मागितलं आहे ते खचितच आपला उद्धार साधून देतील यात संशय नसावा. त्यासाठीच स्वामी कलियुगात पुन्हा अवतरले आहेत व आजही वृंदावनात चिन्मय अवस्थेत बसून कार्य करीत आहे.  आजच्या दिवशी स्वामी ज्या कारणासाठी अवतरले ती भगवंताप्रती भक्ती आणि त्यायोगे आपल्या उद्धाराचे मागणे आपण स्वामींकडे मागूया आणि स्व. पं. भीमसेन जोशी यांनी त्यांच्या स्वरांनी अजरामर केलेल्या अभिनव जनार्दन दासांनी रचलेल्या स्वामींवरील एका अभंगाचे चिंतन करत इथेच थांबूया!

BeFunky Collage1

तुंगातीरदि निंत सुयतिवरन्यारे पेळमय्य । संगीत प्रिय मंगळ सुगुणित रंग मुनिकुलोत्तुंगा कणम्मा ॥

दास थोड्या वेगळ्या पद्धतीने स्वामींचं वर्णन आपल्यापुढे ठेवतात. यात दास पेळमय्य म्हणत सांग ग! हे आई सांग गं असं विचारत आहेत. कदाचित ती म्हणजे साक्षात तुंगभद्राच असेल किंवा कदाचित त्या क्षेत्रीची देवता मंचालम्मा असेल की जिची आज्ञा घेऊन स्वामींनी या क्षेत्री समाधी घेण्याचे ठरवले. थोडक्यात दास एका स्त्रीला विचारत आहेत. ती कोण हे सांगता येत नाही कारण पुढे दास कणम्म म्हणजे सखे किंवा गडे याअर्थी म्हणतात. (भीमसेन जोशींनी गायलेल्या अभंगात हा शब्द नाही. असे अनेक पाठभेद अभंगात सापडतील.)  कदाचित एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला, तिच्या मैत्रीणीला विचारत असेल अशीही कल्पना दासांनी केली असावी! निश्चित सांगता येत नाही.  काही ठिकाणी नोडम्म म्हणजे पहा गं असाही पाठभेद दिसून येतो. पेळमय्य हे आश्चर्यवाचक किंवा पहा गं म्हणूनही वापरण्यात येते! असे अनेक भेद इथे आहेत पण थोडक्यात दास स्वामींचं वर्णन वेगवेगळी विशषणे वापरून आपल्यसमोर ठेवत आहेत हा या अभंगाचा सारांश आहे.

दास विचारत आहेत, तुंगातिरी निवास करणारे, संगीत प्रिय असणारे, अनेक मंगळ गुणांचे धाम असणारे, मुनी कुलातील सर्वोच्च असे हे यती कोण आहेत? सांग ग! मला या यतींबद्दल सांगशील का?

चेल्व सुमुख फणियल्लि तिलकनामगळु पेळमय्य । जलज मणियु कोरळोळु तुळसि मालेगळु पेळमय्य ॥ सुललित कमंडल दंडवन्ने धरिसिहने पेळमय्य । खुल्ल हिरण्यकनल्लि जनिसिद प्रह्लादनु तिनिल्लिहनम्म ॥

ज्यांचे मुख अतिशय सुंदर आहे, देखणे असे ज्यांचे रूप आहे आणि त्यावर तिलक, चंदनाची द्वादश नामे लावली आहेत, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्यांच्या एका हातात कमंडलु आहे तर दुसऱ्या हातात दंड आहे अशा या यतींबद्दल मला सांगशील का? दुष्ट अशा हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आलेले हे भगवंताचे भक्त इथे यती म्हणून थांबले आहेत त्यांच्याबद्दल मला सांग!

सुंदर चरणारविंद सुभकुतियलिंदा पेळमय्य । वंदिसि स्तुतिसुव भूसुररू बलुवृंदा पेळमय्य । चंददलंकृतियिंद शोभिसुव आनंदा पेळमय्य । हिंदे व्यासमुनियेंदेनिसद कर्मंदिगळरसघदिंद रहितने ॥

ज्यांच्या सुंदर चरणकमलांना भक्तीभावाने पाहिले जाते, या धरतीवरील चांगल्या लोकांचा वृंद ज्यांना वंदन करतो, ज्यांची स्तुती करतो, ज्यांना केलेले अनेक अलंकार शोभून दिसतात ते, जे याआधी व्यासतीर्थ होते, ज्यांना कर्माचा लेप नाही, जे कर्मबंधनाच्या पलिकडे गेलेले आहेत, कर्मबंधन रहित अशा या यतींबद्दल सांग ग!

अभिनव जनार्दन विठ्ठलन ध्यानिसुव पेळमय्य । अभिवंदितरिगे अखिलार्थव सल्लिसुव पेळमय्य ॥ नभमणियंददि भूमियल्लि राजिसुव पेळमय्य । शुभगुण निधि श्रीराघवेंद्र यति अंबुजभवांडदोळ प्रबल कणम्म ॥

शेवटच्या चरणात दास हे यती कोण याचे उत्तर देतात. दास साहित्यातील सगळे अभंग पाहिले तर प्रत्येक दासांनी आपली नाममुद्रा ही भगवंताला उद्देशून वापरली आहे. त्यातही ही आपली नाममुद्रा हा ममकार चिकटू नय म्हणून ती नाममुद्रा ते भगवंताला उद्देशून वापरतात. तशा हेतूने दास म्हणत आहेत की अभिनव जनार्दन विठ्ठलाचे म्हणजेच भगवंताचे ध्यान जे करतात, इह-पर असे अखिल अभीष्ट मनोरथ पूर्ण करणारे ते, आकाशात आणि या भूमीवर जे विराजमान आहेत, असे ते यती समस्त शुभ गुणांचा सागर असणारे श्रीराघवेंद्र यती आहेत जे या संपूर्ण ब्रह्मांडात प्रबळ आहेत गं!

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

लेखक – वादिराज विनायक लिमये

भ्रमणध्वनी – ९७६२७४४४०७

तुंगातीरदि निंत स्व. पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरातील – https://www.youtube.com/watch?v=Jgkqo8i54l8

One thought on “॥ शुभगुण निधि श्रीराघवेंद्र यति ॥

Leave a comment