संत श्रीमहिपतीदास

IMG-20160104-WA0015.jpg

( वरील छायाचित्र –  संत काखंडी माहिपतीदास यांची समाधी ).

(महाराष्ट्रातील महिपतीदास आणि हे महिपतीदास दोन वेगळे सत्पुरूष आहेत. तसेच कुणीतरी या महिपतीदासांचे चरित्र जसेच्या तसे सांगून त्यांना दत्त सांप्रदायातील एक महिपतीदास म्हणूनही भासवले आहे. अर्थात त्याचे पुरावे विचारल्यावर ते सद्गृहस्थ गप्प बसले. असो. लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आधीच ही टीप लिहीत आहे. हे संतमहिपतीदास काखंडी गावचे म्हणून “काखंडी महिपतीदास” म्हणून ओळखले जातात. संत महिपतीदासांचे चरित्र पूर्णतः स्वतंत्ररित्य ग्रहण करावे ही इच्छा).

काही संत सत्पुरूषांच्या जीवन चरित्रावरूनच, ते कसे होते? याचे ज्ञान आपल्याला होते. महिपती दासांच्या बाबतीत त्यांचे जीवन चरित्र फारसे उपलब्ध नसून सुद्धा त्यांच्या पदांवरून, रचनांवरून ते कसे होते याचे ज्ञान आपल्याला होते. सांप्रदाय, विविध मते या सर्वांचे पाश तोडून परमार्थ कसा करावा, यासाठी महिपती दास हे एक उत्तम मार्गदर्शक आहेत. ध्यान करा, भगवंताला असे पहा वगैरे रचना, अभंग आपण ऐकतो पण महिपती दासांनी, ‘मी काय केलं, ज्यामुळे मला भगवंत दिसला’ हे सर्व अनुभव त्यांच्या रचनांमधून सांगितलेले आहेत. त्यांचे उपलब्ध असणारे चरित्र आपण थोडक्यात जाणून घेऊया.

भगवान श्रीहरीचे भक्त असणाऱ्या कोणेरीराय यांचा मुलगा म्हणजेच नंतरचे महिपती दास. १६११ साली त्यांचा जन्म झाला. उपलब्ध माहिती वरून ‘काठवते’ हे त्यांचे घराणे. ‘कोल्हार प्रह्लाद कृष्णाचार्य’ यांच्याकडून त्यांनी वेदध्ययन पूर्ण केले. संस्कृत, कन्नड, मराठी, हिंदी, उर्दु, पर्शियन या भाषा त्यांना अवगत होत्या. लहानपणीच एका ज्योतिषाने, ‘हा मुलगा राज दरबारी असेल आणि नंतर एक योगी होईल’ असे सांगितले. व्यवहारातले शिक्षणंही महिपती दासांनी घेतले होते. हिशेबात चूक आली तर, “महिपती दासांकडे जाऊया, ते लगेच ती सांगतील आणि दुरूस्त करतील” असे सर्वच गावकऱ्यांच्या तोंडी असे. श्रीमद्‍ भागवत, रामायण यावरील प्रवचने महिपती दास गावकऱ्यांना देत असत. विविध भाषा येत असल्यामुळे इतर धर्मीय देखील ती प्रवचने ऐकायला येत असत.

एकदा “खव्वास खान” नावाचा आदिलशाही दरबारातला मंत्री महिपती दास ज्या नृसिंहाच्या देवळात प्रवचनास बसायचे तेथून जात होता. त्यानेही ते प्रवचन काही काळ ऐकले आणि ते प्रवचन दरबारात व्हावे असे त्याला वाटू लागले. महिपती दासांना त्याने तशी विनंती केली आणि दासांनी ती मान्य केली. दुसऱ्या दिवशी महिपती दासांनी दरबारात रामायण आणि श्रीमद्‍ भागवतावर प्रवचन केले. ते उर्दु आणि पर्शियन भाषेत असल्यामुळे मुस्लिम मंडळी आणि मुल्ला वगैरे सर्वांनी ते ऐकण्यास गर्दी केली होती.

शास्त्राभ्यासा बरोबरच ते उत्तम लेखपाल होते. दरबारात असाच एकदा हिशेब लागत नव्हता. महिपती दासांकडे हे प्रकरण आले. त्यांनी ते लगेच सोडवले. नवाबाला खूप आनंद झाला. त्यांचे काम, प्रामाणिकपणा पाहून त्यांने दासांना दिवाण पद बहाल केले. नंतर दासांचा विवाह झाला. राजाश्रय लाभून सुद्धा ते कधी त्या ऐश्वर्याच्या मागे-मागे गेले नाहीत. परमेश्वर कृपेने जे मिळाले आहे त्यात समाधान मानून भगवंत नामस्मरणात ते असत.

 

विजापूर मध्ये शहानंगा आणि शहानुंगी हे सुफी पंथातील बहीण भाऊ राहत असत. भविष्यातील घटना सांगण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पण ते कुठे असायचे हे जास्त कुणाला माहित नसायचे. त्यांचा मुक्काम कधीच एका जागी नसे.

एकदा त्या भागात बांधकाम चालले होते. महिपती दास त्याची पाहणी करत होते. शहानंगा आणि शहानुंगी हे तिथे आले. त्यांनी महिपती दासांच्या हातातील अंगठी पाहिली. त्यावर राजमुद्रा होती. ती त्यांनी हिसकावली आणि जवळच्या तलावात फेकून दिली. ती दिवाण पदाची अंगठी असल्यामुळे महिपती दास घाबरले. ‘ती माझी अंगठी नाही, पण दरबारात जे पद मी सांभाळतो त्याची आहे.’ ‘कृपा करा, पण ती अंगठी मला परत द्या.’ असे महिपती दास म्हणाले. शहानंगांनी त्यांच्या बहिणीला तलावातून अंगठी काढण्यासाठी सांगितले. तिने तलावातून असंख्य अंगठ्या काढल्या. पण दासांची त्यात अंगठी नव्हती. दासांनी शहानंगांना विनंती करून आपली अंगठी देण्यास सांगितले. “मौत का घान” (मृत्यूचा वास) असे म्हणत त्यांनी दासांची अंगठी परत केली.

महिपती दासांना शहानंग जे म्हणाले ते कळले नाही. त्यावर त्यांनी खूप विचार केला. आणि शेवटी शहानंगानाच त्याचा अर्थ विचारायचे ठरवले. त्यांना शोधणे महाकठीण पण एकादाची भेट झाली आणि दासांनी त्याचा अर्थ विचारून शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. शहानंगांनी त्यास नकार दिला आणि सारवाडा येथील भास्करस्वामी या अद्वैती संन्यासांकडे जाण्यास सांगितले. तो तुला योग्य मार्गदर्शन करील असे सांगितले.

आता मार्ग तर मिळाला होता. दिवाणपद सोडून भास्कर स्वामींकडे जायचे ठरवले. नवाब त्यांना सोडण्यास तयार नव्हता. पण त्याच्या बायकोच्या भावाला दिवाण पद द्यावे असा बायकोचा हट्ट असल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. यात महत्त्वाचे म्हणजे दासांची पत्नी या त्यांच्या निर्णयावर खूश होती. तिनेही, ‘मी सुद्धा तुमच्याबरोबर सरवाड्याला स्वामींकडे येईन’ असे सांगितले.

भास्करस्वामी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही भागात परिचित होते. दास आणि त्यांची पत्नी स्वामींकडे आले. स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना उपदेश केला. इथूनच त्यांचा अध्यात्मिक प्रवास सुरू झाला.

नंतर त्यांना देवराय आणि कृष्णराय अशी दोन मुले झाली. देवराय हा योद्धा झाला आणि एका छोट्याशा सैन्यात सामील झाला. तर दुसरा कृष्णराय हा वडीलांप्रमाणेच हरिदास झाला. काहीकाळ भास्करस्वामींजवळ राहून नंतर ते गुलबर्गा जिल्ह्यात शहापूर गावी मंदाकिनी नदी काठी एका हनुमान मंदिरात साधना करू लागले. तिथूनच ते महिपती दास म्हणून ओळखू जाऊ लागले. भजने, किर्तने, प्रवचने या साठीच त्यांनी त्यांचे आयुष्य वेचले.

भास्कर स्वामींकडून उपदेश घेतल्यानंतर “महिपती” या नाममुद्रेने पद, रचना होऊ लागल्या. महिपती दास स्वतः माध्व सांप्रदायातील होते. शहानंगांनी, भास्कर स्वामी या अद्वैती गुरूंकडे जा असे सांगितल्यावर, ‘ते अद्वैती हे काय माझा उद्धार करणार? मी द्वैती आहे. आमचे तेवढे श्रेष्ठ आहे’ असं म्हणू शकत होते. किंवा भास्करस्वामीही, ‘तुम्ही द्वैती, तुम्ही कायम पायरीवर राहता त्यावर आमचे अद्वैत आहे. तुम्ही माध्व, तुम्हाला मी शिष्य करून घेणार नाही’ असे म्हणू शकत होते. पण असे काहीच घडले नाही किंवा कुणाच्या मनात देखील तसे आले नाही.

कारण इथे जीव योग्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची जशी योग्यता तसा त्याचा प्रवास. डॉक्टर लोक सुद्धा सारख्या रोगाला सगळ्यांना सारखे औषध देत नाहीत. ज्याची जशी प्रकृती तसे त्याचे औषध. असेच इथे आहे. आणि हे नाकारले तरी उघड, दिसणारे असे सत्य आहे. विविधता, भेद ज्याअर्थी आहे त्याअर्थी तो भगवंताच्याच इच्छेने आहे आणि त्याच्या इच्छेने जे चालते ते सत्यच आहे. हेच आपल्याला महिपतीदासांच्या चरित्रावरून ज्ञात होते.

असा हठयोग आणि भक्तीयोग संगम ज्यांच्या सर्व जीवन चरित्रातून तसेच अभंग रचनांमधून प्रकट झाला त्या सिद्ध तपस्वी संत श्रीमहिपतीदासांना वंदन करूत इथेच विरामूया!

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

लेखक – वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी – ९७६२७४४४०७