***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)

14595773_1612229995745197_1440304134398741422_n

इकडे तिकडे कुठेही न जाता भक्तांच्या घरामध्ये तू स्थिर राहा म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल अशी विनवणी करून दास पुढे म्हणतात,

सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥

हे आई, साधु सज्जनांना तुझ्यामुळे सत्य बघता येते, जाणता येते. त्यांना सत्य दाखवणारी तू आहेस. इथे चित्तदि म्हणजे चित्त हा अर्थ नाही. सोने जसे चकाकते, त्याचे जसे तेज असते, त्याने दैदीप्यमान झालेल्या, मोहक अशा एका बाहुलीसारखे तुझे रूप आहे. गोंबे म्हणजे बाहुली. पुत्थळि म्हणजे मोहक किंवा क्षणात आवडेल असे.

आई महालक्ष्मीची कृपा असल्याशिवाय साधना सुरूच होत नाही. सकल जीवांची आई आहे ती. आई श्रेयस्कर देते, प्रेयस्कर नाही. सत्य दाखवणारी अशी ती आहे. आणि आपण भगवंताचा हट्ट धरलेला आईला आवडतो. ती खचितच तो हट्ट पुरवते. त्या परब्रह्म भगवान नारायणापर्यंत जी पोहोचवते ती ही आई महालक्ष्मी. भगवंताच्या शंख, चक्र, गदा, पद्म यातील पद्म हे मोक्षाचे प्रतिक मानले गेले आहे. शांती, सत्त्व, मोक्ष प्रदान करणारे. आणि आई महालक्ष्मी तोच मार्ग दाखवते.

याविषयी श्रीसूक्तात वर्णन येतेच, पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मालये पद्मदलायताक्षी । असा मोक्षाचा मार्ग ही पद्मरूपी लक्ष्मी प्रदान करते. आपल्या सर्वांचा प्रवास हा अनित्यात राहून शाश्वत सत्यासाठीच तर चालला आहे. तो सत्याचा मार्ग दाखवणारी तू आहेस आई.

आणि पुढे तिच रूप कसं आहे याविषयी सांगतात,

चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥
बाहुली कशी मोहक असते. येथे मोहकचा शब्दशः अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पण अशी गोष्ट जी सहज आपल्याला आवडते आणि आपली होऊन जाते. असा गुण जिच्यात आहे अशी बाहुलीसारखी आणि त्याचबरोबर सोने, चांदी, हिरे हे जसे चकाकतात आणि त्याचे जे तेज असते त्याने प्रकाशित झालेले असे तुझे रूप आहे.

क्रमशः

लेखक – वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी – ९७६२७४४४०७

One thought on “***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)

  1. Pingback: भाग्यदा लक्ष्मी बारम्मा(भाग ६ – भाग १०) | कमळांची ओंजळ

Leave a comment